क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासंबंधी गेल्या वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. याप्रकरणी सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील, नगरसेवक राजू शिंदे, यांच्यासह शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेत जाब विचारला. यावेळी महापौरांनी दिलगिरी व्यक्त करत शिवजयंती पूर्वी काम सुरु करतो असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौकातील अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी विनोद पाटील, नगरसेवक राजू शिंदे, अभिजित देशमुख यांच्यासह मराठा समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मनपाने २४ मार्च २०१८ ला यासंदर्भात प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावास ११ डिसेंबर २०१८ ला आयुक्तांनी प्रशासकीय मान्यताही दिली होती. सर्वसाधारण सभेत प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. असे असताना प्रत्यक्षात काम सुरु करण्यास चालढकल सुरु असून कशातही पैसे आणि राजकारण करणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांना या कामात टक्केवारी मिळत नाही म्हणून दिरंगाई करत असल्याचा आरोप विनोद पाटील यांनी केला.
महाराजांबद्दल थोडा आदर असेल तर रात्री बाराला स्थायी समितीची बैठक घेऊन मंजुरी घ्या
यावेळी अधिकारी राजपूत यांनी ७ तारखेला टेंडर झाले आहे. स्थायी समितीची मंजुरी झाली की लगेच काम सुरु होईल असे सांगितले. नगरसेवक राजू शिंदे यांनी अधिकाऱ्यास चांगलेच फटकारले, शिंदे म्हणाले की, किती दिवस झाले याला काही मर्यादा आहे की नाही, तुम्हाला अजिबात गांभीर्य दिसत नाही. स्मारकाची चेष्ठा चालवली आहे. एकतर ७ तारखेला टेंडर झाले तर मग ८ तारखेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी का नाही पाठवले. स्थायी समितीत ऐनवेळीचे अनेक विषय येतात आणि कोणकोणते विषय पास करता माहित नाही का ? या कामात काही भेटत नाही म्हणून वर्षभरापासून चालढकल सुरु असल्याचा आरोप शिंदेंनी केला. जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडा आदर असेल तर रात्री बाराला स्थायी समितीची बैठक घेऊन मंजुरी घ्या आणि १५ तारखेला काम सुरु करा असे शिंदे म्हणाले.
कामासाठी पीएमसी म्हणून धीरज देशमुख यांना नियुक्त केले आहे तर हैद्राबाद येथील गायत्री आर्किटेक्ट यांना काम देण्यात आले आहे. काम अतिशय चांगल्या प्रकारे होणार असल्याचे महापौर घोडेले यावेळी म्हणाले. त्यानी तात्काळ शहर अभियंता सखाराम पानझडे यांना आदेश देत १५ तारखेला कंपनीच्या अधिकाऱ्यास बोलावून घ्या आणि काम सुरु करा अशा सूचना दिल्या.
उपस्थितात शाब्दिक खडाजंगी
यावेळी शिष्टमंडळ व महापौर, अधिकारी यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली यावेळी संतप्त झालेल्या पाटील यांनी मनपाची ऐसी कि तैसी म्हणत आम्हाला नाहरकत द्या आम्ही उद्यापासून काम सुरु करतो असा प्रस्ताव देखील महापौरांकडे ठेवला शिवजयंती पूर्वी काम सुरु करतो असे आश्वासन महापौरांनी दिल्याने मंडळाने प्रशासनाला वेळ दिला